अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राला अव्वल बनवणार - हरसिमरत कौर

Foto


औरंगाबाद- महाराष्ट्रासाठी जवळपास दोन हजार पाचशे कोटींच्या एकूण १०९ अन्न प्रक्रिया उद्योग प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यातून दहा हजार कोटींची गुंतवणूक व रोजगार निर्मिती होईल,  असे मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज मांडले. तसेच या क्षेत्रात देशात महाराष्ट्रच अव्वलस्थानी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

औरंगाबाद -पैठण रस्त्यावरील धनगाव येथे  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेंतर्गत निर्मित पैठण मेगा फूड पार्कच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती कौर बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संदीपान भुमरे, महापौर नंदकुमार घोडेले,  केंद्रीय उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ.राकेश सरवाल, नाथ उद्योग समुहाचे चेअरमन नंदकिशोर कागलीवाल, कार्यकारी संचालक सतीश कागलीवाल, संचालक आकाश कागलीवाल आदींची उपस्थिती होती.

 

कौर यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 

महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून पैठण मेगा फूड पार्क उभारला आहे.

 

महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योग वाढतो आहे. महाराष्ट्रात केंद्र शासनाने सातारा, औरंगाबाद आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कला मंजुरी दिली आहे.

 

५३ शीतगृहे, १८ अन्न तपासणी प्रयोगशाळा, आठ मिनी फूड पार्क, ११ बकवर्ड फॉरवर्ड लिंकेज आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे.

 

प्रधानमंत्री किसान संपदा, मिनी फूड पार्क, बँकेशिवाय निधी, या योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली. 

 

सुभाष देसाई यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 

संत एकनाथ, पैठणीमुळे पैठणचे नावलौकिक आहे. परंतु या पार्कमुळे पैठणची नवीन ओळख निर्माण होईल.

 

लवकरच मराठवाड्यात वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येईल.


डीआयएमसीतील सरंक्षण साधने उत्पादन क्षेत्र, मिनी फूड पार्क मधील गुंतवणुकीतून मराठवाड्याचा विकास साधणार

 

ज्येष्ठ संशोधकांचा गौरव

 

भाजीपाला उत्पादनाची तंत्रशुद्ध माहिती असलेल्या शेतकरी मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचनही यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधक यांचाही कौर, देसाई यांच्याहस्ते गौरव करणात आला.

 

पैठण मेगा फूड पार्कची वैशिष्ट्ये

 

भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेअंतर्गत प्रकल्प.

       

 नाथ ग्रुप फूड पार्कचे मुख्य प्रवर्तक.

       

100 एकर क्षेत्रावर व्याप्ती.

       

आतापर्यंत जवळपास 500 शेतकरी फूड पार्कशी प्रत्यक्षपणे जोडले गेले त्यांच्या माध्यमातून 500 एकरावर मका पिकाची तंत्रशुद्ध लागवड.

       

फूड पार्कमध्ये अद्ययावत मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र.

       

इसारवाडी, कन्नड आणि आळेफाटा येथे तीन प्राथमिक प्रक्रिया केंद्रे.

 

फूड पार्कमध्ये टेस्टींग लॅब, फ्रोझन व कोल्ड स्टोअरेजेस, मॉडर्न वेअर हाऊस, सॉर्टींग व ग्रेडींग लाइन्स, टेट्रापॅक (UHT) दूध प्रक्रिया व दूग्ध पदार्थ तसेच IQF आदी सुविधा.